Sunday, September 22, 2013

पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन धम्माल पुन्हा पुन्हा..

‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ चित्रपटमालिकेतील चित्रपट तुम्ही किती वेळा पाहिले आहेत? जॉनी डेपने या चित्रपटांसाठी घेतलेला सागरी चाच्याचा अफलातून अतरंगी अवतार कॅप्टन जॅक स्पॅरो आणि त्याच्या करामती कारवायांच्या मनोरंजक कथा प्रेक्षकांसमोर आणणा-या या चित्रपटांबद्दल केवळ हाच प्रश्न विचारता येईल. कारण उघड आहे.
‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ चित्रपटमालिकेतील चित्रपट तुम्ही किती वेळा पाहिले आहेत? जॉनी डेपने या चित्रपटांसाठी घेतलेला सागरी चाच्याचा अफलातून अतरंगी अवतार कॅप्टन जॅक स्पॅरो आणि त्याच्या करामती कारवायांच्या मनोरंजक कथा प्रेक्षकांसमोर आणणा-या या चित्रपटांबद्दल केवळ हाच प्रश्न विचारता येईल. कारण उघड आहे. कुठल्या ना कुठल्या मूव्ही चॅनेलवर चार चित्रपटांच्या या मालिकेतील कुठला ना कुठला चित्रपट सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री, उत्तररात्री कधी ना कधी सुरूच असतो. आणि आपण या चॅनेलवर उशिरा जरी पोहोचलो असलो, चित्रपट अध्र्या वाटेवर पुढे सरकला असला तरी उर्वरित चित्रपट पूर्ण होईतो ते चॅनेल बदलण्याची वा टीव्ही बंद करण्याची इच्छा होणे अशक्यच असते..
‘कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल’ हा या मालिकेतील पहिला चित्रपट. २००३ मध्ये झळकलेल्या या चित्रपटाबद्दल खुद्द निर्माते आणि स्टुडिओही चित्रपट कितपत चालेल याबद्दल साशंक होते. म्हणून प्रारंभी फक्त ‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ एवढेच नाव ठेवण्याची स्टुडिओची तयारी होती. पण कुठल्या तरी बैठकीत कुणीतरी भविष्याचे शुभसंकेत दिल्यासारखी एक सुशंका उपस्थित केली.. ‘चित्रपटात जॉनी डेपसारखा स्टार आहे, भन्नाट कथा आहे, पडद्यावर तरी सारं मस्त धमाल जुळून आल्यासारखं दिसतंय. मग चित्रपट चालला तर? दुसराही भाग काढता येईल की..’, अशी सगळी चर्चा झाल्यावर मग मूळ नावाला ‘कर्स ऑफ दी ब्लॅक पर्ल’ जोडण्यात आलं. चित्रपट प्रदर्शित झाला. कॅप्टन जॅक स्पॅरो, ओरलँडो ब्लूमचा विल टर्नर, छान निरागस दिसणारी किआरा नाइटलेने साकारलेली एलिझाबेथ सगळ्यांना प्रेक्षकांनी फुल्ल मार्क्‍स दिले. बॉक्स ऑफिसवर खणखणाट करणा-या या चित्रपटानं धमाल उडवली. त्या वर्षी तब्बल पाच ऑस्कर पुरस्कारांसाठी या चित्रपटाची शिफारस झाली होती. कॅप्टन जॅक स्पॅरोसह सा-याच व्यक्तिरेखांची वेशभूषा, रंगभूषा, ध्वनी संकलन, स्पेशल इफेक्ट्स सारं सारं जबरदस्त होतं. या प्रत्येक किमयागारीसाठीच ऑस्कर शिफारस झाली होती हे वेगळे सांगायची गरज नाही. प्रेक्षकांवर या चित्रपटानं त्या वेळी इतका प्रभाव टाकला की पुढचा भाग कधी येणार, अशी विचारणा प्रेक्षकांकडून होण्याआधीच दिग्दर्शक गोर व्हर्बिन्स्की आणि त्याच्या टीमने, निर्मात्यांनी पुढच्या भागाची तयारी सुरू केली होती.
महाइब्लिस, महाअतरंगी असा कॅप्टन जॅक स्पॅरो, त्याला साजेसे असे त्याचे बदमाश साथीदार, त्यांचे जहाज ब्लॅक पर्ल, जॅकशी खुन्नस असणारा जेफ्री रशचा कॅप्टन बाबरेसा, खवळलेल्या समुद्राला भेदून वर येणारे भुताळी जहाज ‘द फ्लाइंग डचमन’, या जहाजावरील अर्धमृत खलाशी, भरसमुद्रात या चाच्यांच्या आणि ब्रिटिश आरमाराच्या ताफ्याशी होणा-या चकमकी, चाच्यांनी दडवलेल्या खजिन्याच्या प्रचंड राशी.. वाढत्या वयातही मनाच्या कुठल्या तरी कोप-यात खोडकर मुलासारखं दडून राहिलेल्या शैशवाला भुलवणारं, साहसी, स्वप्नाळू भाववृत्तीला उत्तेजित करणारं, गुंगवून टाकणारं असे हे कथानक. जॅक स्पॅरोच्या करामती मग डेड मॅन्स चेस्ट, अ‍ॅट वर्ल्डस् एन्ड, ऑन स्ट्रेंजर टाइड्स या पुढच्या भागांमधून प्रेक्षकांसमोर आल्या आणि हे सर्व चित्रपटही तितकेच चालले, गाजले. अपवाद म्हणावा तो चौथ्या भागाचा. तो रॉब मार्शलने दिग्दर्शित केला होता. अनेकांना या संपूर्ण मालिकेतील हा चित्रपट बराचसा बोअर, कंटाळवाणा वाटला आणि तो आलाही ब-याच उशिरा.
जेरी ब्रुकहेइमर फिल्म्स आणि वॉल्ट डिज्नी पिक्चर्स यांनी या चित्रपटांमुळे चिक्कार पैसा कमावला. व्हीडीओ गेम्सही आले. अनेक गाजलेल्या चित्रपटांचं मूळ एखाद्या कादंबरीत वा कथेत असतं. इथे तसं काहीच नव्हतं. डिज्नी पिक्चर्सला ही सगळी आयडीयाची गम्मत सुचली ती त्याच्या डिज्नीलँड पार्कातील पायरेट्स राइडमुळे. या आयडियाचं पुढे पटकथाकार आणि संवादलेखकांनी सोनं केलं. चटपटीत संवादांचाही चित्रपटाच्या यशात मोठा सहभाग असतो हे पायरेट्सच्या संवादांनी विशेषत: जॅक स्पॅरोसाठी लिहिल्या गेलेल्या संवादांनी सिद्ध केले.
या चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी ताटकळलेल्या चाहत्यांसाठी खूशखबर अशी की या चित्रपटमालिकेतील पुढचा म्हणजेच पाचवा भाग ‘डेड मेन टेल नो टेल्स’च्या निर्मितीचे काम सुरू आहे. ‘कोन-टीकी’ चित्रपट बनवणा-या जोकीम रॉनिंग, एस्पेन सँडबर्ग या दिग्दर्शकद्वयीकडे पाचव्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून ‘नाही-नाही’ म्हणणारा जॉनी डेप, ‘आता हा भाग शेवटचाच’ म्हणत पुन्हा जॅक स्पॅरोची पायरेट हॅट डोक्यावर चढवून त्याचा इरसालपणा दाखवणार आहे. जॅक स्पॅरोच्या अतरंगीपणासह इतर व्यक्तिरेखांचेही अंतरंग खुलवणारा पटकथाकार टेड एलियट या नव्या कथानकासाठीही व्यक्तिरेखांना आकार-उकार देणार आहे. येथे जॅक आहे, बाबरेसा आहे, चेटकिणी, भुतेखेते आहेत, जॅकसाठी नवी नायिका आहे आणि एक नवी जोडीही आहे. बम्र्युडा त्रिकोणाच्या रहस्याचा पायरेट्स स्टाइल पर्दाफाशही या नव्या कथानकातून होईल, अशी खबर आहे.एवढया सगळ्यासाठी २०१६ उजाडायची वाट बघावी लागणार आहे. एवढेच काय ते पायरेट्स आणि जॉनी डेपच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग करणारे आहे.

No comments:

Post a Comment